नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क
शनिवारी रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोधले नगर परिसरात युवकाच्या अंगावर चॉपरने सपासप वार करुन हत्या करण्यात आली. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा प्रसंग रस्त्यावर घडला. तुषार देवराम चौरे असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून तुषारच्या ओळखीतल्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तीन संशयितांनी दुचाकीवरुन तुषारच्या दुचाकीचा पाठलाग केला. साधारण दोन किलोमीटरचा पाठलाग करुन हल्ला चढवत तुषारला रक्तबंबाळ केले. काही मिनिटांत तुषारचा जागीच मृत्यू झाला. तुषार चौरे हा बोधले नगर येथील एका दुकानात कामाला होता. आपल्या मित्रासह तो दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन संशयितांनी चौरेच्या दुचाकीला लाथ मारली. दुचाकीहून पडल्याने संशयितांनी धारधार शस्त्राने हल्ला केला, यात चौरे गंभीर जखमी झाला. दुचाकीवरील चौरेचा मित्र पळून गेल्याने वाचला. हल्लेखोर चौरेच्या ओळखीतले असल्याचे आणि पूर्ववैमनस्यातून हल्ला झाला असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.