नाशिक/एनजीएन नेटवर्क
यंग इंडियन्स, आयमा आणि केंद्र सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील युवा पिढीच्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी Y-20 मंथन शिबिर उद्या (दि. ८) आयोजित करण्यात आले आहे.
अंबडच्या आयमा सभागृहात सकाळी १०.३० ते १ दरम्यान होणाऱ्या या सत्रात आय ए एस आशिमा मित्तल, पॉला मॅकग्लेन, निखिल पांचाळ,सुनील खांडबहाले हे मार्गदर्शन करणार आहेत. हा पहिलाच मोठा कार्बन न्यूट्रल उपक्रम नाशिकमध्ये होत असून नाशिकमधील कोणत्याही G20 इव्हेंटपेक्षा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होत आहे. उद्योग व प्रशासकीय क्षेत्रातील युवा मान्यवर यात अनुभवपर विचार मांडणार असून तरूण उद्योजकांशी थेट संवाद साधणार असल्याने भविष्यात भारतातील उद्योग क्षेत्रात नव्या उमेदीने काही करू इच्छिणाऱ्या तरूण मनांना नवी प्रेरणा मिळणार आहे. यामुळे उद्योग जगतात नवे कृतिशील पर्व सुरू होऊन रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या सत्रास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.