मंत्री छगन भुजबळ यांच्या शिफारशीनुसार मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन आयुक्तांना आदेश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
येवल्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन आयुक्तांना आदेश दिले आहे. त्यामुळे येवल्यात लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना याबाबत शिफारस केलेली होती. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहे.
येवला जि. नाशिक येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी दि. ९ मे २०२४ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविलेला होता. परिवहन आयुक्त मुंबई यांचे दि. ७.६.२०२४ चे पत्रान्वये एखाद्या जिल्ह्याचे विभाजन झाल्याशिवाय स्वतंत्र परिवहन कार्यालय स्थापन न करण्याचे शासनाचे धोरण असल्यामुळे येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करता येणार नाही असे कळविले आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिले आहे की,सन २०२४ नंतर चाळीसगाव जि. जळगाव, भडगाव जि. जळगाव, फलटण जि.सातारा, उदगीर जि. लातूर, खामगाव जि. बुलढाणा, वैजापूर जि.छ. संभाजी नगर व जत जि.सांगली या ७ ठिकाणी नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालये निर्माण करण्यात आलेली आहे. जळगाव, सातारा, लातूर, बुलढाणा, छ. संभाजी नगर आणि सांगली या जिल्ह्यांचे विभाजन झालेले नसतानांही या ठिकाणी ही कार्यालये निर्माण करण्यात आली. मात्र येवला येथे कार्यालय निर्माण करण्यासाठी जिल्ह्याच्या विभाजनाचे कारण देऊन येवल्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.त्यामुळे येवला येथे सुद्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण करण्यासाठी तातडीने परिवहन आयुक्तांकडून प्रस्ताव मागवावा असे भुजबळ यांनी प्रताप सरनाईक यांना सांगितले.
सद्यस्थितीत येवला तालुक्यातील वाहनांची नोंदणी नाशिक उपप्रादेशिक कार्यालयामार्फत केली जाते. येवला ते नाशिक हे अंतर ८० किमी असून नागरिकांना वाहन संदर्भात कामाच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. येवला तालुक्यातील वाहन नोंदणी संख्या आणि एकूण लोकसंख्या यांचा विचार करता येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. येवला येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण करण्यासाठी जागा सुद्धा आरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे येवला जि. नाशिक येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात यावे अशी मंत्री छगन भुजबळ यांची मागणी आहे.
Comments are closed.