नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘तिसऱ्यांदा सत्तेत येणार’ असल्याचा ठाम विश्वास बुधवारी बोलताना व्यक्त केला. एकीकडे विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केलेली असतानाच मोदींनी अर्थव्यवस्थेचा संदर्भ देत पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केला. मागील 9 वर्षांमध्ये आपल्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरुन 5 व्या क्रमांकावर आल्याचा उल्लेख मोदींनी केला. ‘तिसऱ्या कार्यकाळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या तीनमध्ये आणू, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी विकासकामांचा उल्लेख करत ‘मी पुन्हा येईन’ असा विश्वास व्यक्त केला. आपल्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाटचाल करेल असं सांगताना पंतप्रधान मोदींनी, तुमची सर्वांची स्वप्ने 2024 नंतर पूर्ण होतील, असं म्हटलं. तसेच ‘ये मोदी की गॅरंटी है’ असे मोदींनी म्हणताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. उपस्थित मोदी समर्थकांनी ‘मोदी… मोदी…’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये आमच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळाची सुरुवात झाली तेव्हा भारत जगातील 10 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आमच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये ती 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. मी देशाला आश्वस्त करतो की, आमच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये भारताचे नाव पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असेही मोदी म्हणाले. आपल्यासमोर भारताच्या विकासाचे पुढील 25 वर्षांचे लक्ष्य असल्याचही मोदींनी सांगितले.