नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव श्री. दिलीप भरड यांच्यासह सर्व विद्याशाखा संचालक, प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देत त्यामुळे संपूर्ण जग भारताच्या सामर्थ्य व क्षमतेने अचंबित झाल्याचे सांगितले. राष्ट्रवाद डोळ्यांसमोर ठेवून देशाच्या प्रगतीसाठी लोकांना शिक्षित – प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट्य विद्यापीठ साध्य करत आहे. वाढवन बंदर संदर्भात कौशल्याधारित रोजगार निर्मितीसाठी घेतलेला पुढाकार, महाज्ञानदीप प्रकल्प, स्वयंरोजगारसाठी मशरूम आदी निर्मितीचे प्रशिक्षण, देशभरातील कुलगुरूंची परिषद आदी विद्यापीठाचे प्रगतशील उपक्रम ठरले असून विद्यापीठ त्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. यानिमित्त त्यांच्या हस्ते विद्यापीठाचे अधिकृत फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यु ट्यूब चॅनेल सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावर विद्यापीठातील विविध कार्यक्रम – उपक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षांचे वेळापत्रक, निकाल तसेच इतर महत्त्वाच्या घोषणा नियमितपणे प्रसिद्ध केल्या जातील. यामुळे विद्यापीठाशी निगडीत अचूक माहिती विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत त्वरित व वेगाने पोहोचून सुसंवाद साधता येईल.
तसेच विद्यापीठातर्फे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दृष्टीकोनाला अनुसरून घेण्यात आलेल्या घोषवाक्य व बोधचिन्ह निर्मिती स्पर्धेतील विजेत्यांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरवण्यात आले. घोषवाक्य विभागात विद्यापीठ कर्मचारी व कुटुंबीय या गटात कु. जैनिका ईशा जोगेंद्रसिंह बिसेन (‘प्रगत भारताचा सशक्त प्रहरी महाराष्ट्र २०४७ देशाचा फेवारी’) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे श्री. विजय मुरलीधर अहिरराव (‘एकत्र प्रगती, सुसंवादाची नीती, शाश्वत विकासासाठी सुशासनाची गती!’) व श्रीमती ज्योती मधुकर पाटील (‘महाराष्ट्र २०४७: समतेचा पथ, प्रगतीचा रथ, सुशासनाची साथ’) यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी गटात परभणीच्या श्री. विकास सुदाम भालेराव (स्वराज्याचे अस्सल प्रतिबिंब – विकसित महाराष्ट्र २०४७’) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांकसाठी नाशिकचे श्री. संजय दगू गोराडे (‘माझा महाराष्ट्र, माझा अभिमान – प्रगतीचे फडकवू निशाण) तर तृतीय क्रमांकसाठी अमरावतीच्या श्रीमती श्वेता अशोक बडगुजर (‘जनमानसाची सतत उन्नती। हीच राष्ट्राची कायम प्रगती।।’) पात्र ठरले. बोधचिन्ह स्पर्धेत विद्यापीठ कर्मचारी व कुटुंबीय गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे श्रीमती उज्वला प्रशांत महाजन, श्री. बाबासाहेब बवानजी जाधव व श्री. दिलीप दामू कुमावत यांची निवड करण्यात आली. विद्यार्थी गटात द्वितीय क्रमांक नंदुरबारचे श्री. मोईनुल्ला हबिबूल्ला मनीयार यांना तर तृतीय क्रमांक अमरावतीच्या श्रीमती श्वेता अशोक बडगुजर यांना प्राप्त झाला. यावेळी विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Comments are closed.