मुंबई/एनजीएन नेटवर्क
‘उमेद’ अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक बचत गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींनाही मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयं सहाय्यता गटांना प्रती गट १५ हजार रुपये फिरता निधी देण्यात येतो. त्यामध्ये वाढ करुन प्रती समुह ३० हजार रुपये फिरता निधी देण्यात येईल. यासाठी राज्य सरकार अतिरिक्त ९१३ कोटी रुपयांची निधीची तरतुद करणार आहे. स्वयं सहाय्यता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) कार्यरत आहेत. त्यांना सर्वसाधारणपणे दरमहा ३ हजार रुपये एवढे मानधन अदा करण्यात येते. बचत गट चळवळीतील त्यांचे योगदान व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करून ते प्रतिमहा ६ हजार रुपये एवढे करण्यात येणार आहे. या करिता १६३ कोटी रुपये एवढ्या अतिरिक्त निधीची तरतुद करणार आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.