मुंबई : एक वैविध्यपूर्ण संशोधन आणि विकासावर केंद्रित असलेला अन्न व कृषी व्यवसाय समूह गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड (Godrej Agrovet) ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (IIMA) आणि गोदरेज DEI लॅब यांच्या सहकार्याने “वूमेन इन अॅग्रीबिझनेस – ऑपॉरच्युनीटीज अँड चॅलेंजेस” (कृषी व्यवसायातील महिला – संधी आणि आव्हाने) हा अहवाल त्यांच्या दुसऱ्या वूमेन इन अॅग्रीकल्चर समीट (महिला कृषी परिषद) मध्ये प्रकाशित केला.
या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की भारताच्या कृषी कार्यशक्तीमध्ये महिलांचा वाटा 64.4 टक्के आहे, मात्र केवळ 6 टक्के ते 10 टक्के महिला अग्रगण्य कृषी आणि कृषी-संबंधित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. या अहवालात कृषी व्यवसायात समावेश, नाविन्यपूर्णता आणि समान विकासासाठी कृतीयोग्य उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत.
या अहवालावर भाष्य करताना गोदरेज अॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, “गोदरेज अॅग्रोवेटमध्ये आमचा असा विश्वास आहे की कृषी व्यवसायाचे भवितव्य हे महिलांना शिक्षण, कामाच्या ठिकाणी सर्वसमावेशकता आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून सक्षम बनवण्यात आहे. कौशल्य आणि उद्योगाच्या गरजांशी जोडून घेत प्रोत्साहनपर मार्गदर्शन आणि सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करून आम्ही अर्थपूर्ण बदल घडवण्याचे आणि एक सक्षम, न्याय्य क्षेत्र उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”
ते पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी, आम्ही कृषी मूल्य साखळीत 1,00,000 महिलांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिले होते आणि मला अभिमान आहे की केवळ एका वर्षात आम्ही 20,000 महिलांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. प्रशिक्षण, सुरक्षित जागा निर्माण करणे आणि नेतृत्वाला प्रोत्साहन यातून आम्ही एक सक्षम कृषी व्यवसाय समुदाय उभारण्याच्या दिशेने काम करत आहोत.”
IIMAच्या प्राध्यापिका विद्या वेमिरेड्डी यांनी सांगितले, “भारतातील कृषी क्षेत्रात एक मोठा विरोधाभास दिसून येतो: महिलांचा कृषी विषयक कामात आणि शैक्षणिक गटांमध्ये मोठा सहभाग असला तरी पदवीधर महिलांपैकी बहुसंख्य महिला औपचारिक रोजगाराच्या रचनेत आणि नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये प्रवेश करत नाहीत. या अभ्यासात कृषी व्यवसाय उद्योगांमध्ये महिलांच्या औपचारिक रोजगार सहभागासंबंधीच्या महत्त्वाच्या ज्ञानाच्या उणिवांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.”
हा अहवाल कृषी क्षेत्रातील लिंगभेद दूर करण्यासाठी एक रोडमॅप प्रदान करतो. संसाधनांमध्ये समान प्रवेश, स्त्री-पुरुष यांच्या अनुरूप प्रशिक्षण आणि सर्वसमावेशक अशी कामाच्या ठिकाणातील सुधारणा यांसाठी यात आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण ते रोजगार बदलाला प्राधान्य देणे, नेतृत्व प्रतिनिधित्व वाढवणे आणि आर्थिक तसेच तांत्रिक साधनांचा उपयोग करणे या गोष्टी परिवर्तनात्मक धोरणे म्हणून अधोरेखित करण्यात आल्या आहेत. एकत्रितपणे, या उपाययोजना महिलांना सक्षम बनवण्याच्या आणि कृषी मूल्य साखळीत समान विकासाला चालना देण्याच्या दिशेने वाटचाल करतील.
या समिटमध्ये गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन निसाबा गोदरेज आणि गोदरेज अॅग्रोवेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव यांनी ‘गोदरेज अॅग्रोवेट वूमेन इन अॅग्रीकल्चर स्कॉलरशीप’ सादर करण्याची घोषणा केली. ही शिष्यवृत्ती कृषी अभ्यास करणाऱ्या पाच विद्यार्थिनींना सक्षम बनवून पुढील पिढीत महिला नेतृत्व विकसित करण्यासाठी देण्यात येणार आहे.