NGN News
Latest Marathi News

‘त्या’ अनुल्लेखावर महिलेचा तीव्र आक्षेप; गिरीश महाजन यांची दिलगिरी

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळल्याचा आरोप

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करीत वन विभागातील एका महिलेने गोंधळ घातल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माधवी जाधव असे या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, माझ्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अनावधानाने राहिले, माझा तसा कुठला हेतू नव्हता असे सांगत त्याबाबत आपण दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी नंतर दिली.

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख झाला नाही. त्यावर तिथे उपस्थित असलेल्या माधवी जाधव या शासकीय महिला कर्मचाऱ्याने आक्षेप नोंदवला. टी महिला म्हणाली, महाजन यांनी भाषणात डॉ. आंबेडकरांचे नाव घेतले नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. मंत्र्यांची चूक आहे. मी माफी मागणार नाही. मंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला सस्पेंड करायचे असेल तर खुशाल करू शकतात. मी कोणतेही काम करेन पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावे वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचे नाव भाषणात का नाही, असा सवाल तिने उपस्थित केला.

——-

 @ माझ्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख राहिला असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळेस असे काही होत नाही. मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो.

  • गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र

Comments are closed.