नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
१९७१ च्या पाकिस्तान युद्धात तसेच १९९९ च्या कारगिल युद्धाचे वेळी मोलाची कामगिरी बजावलेले व आपल्या दीर्घ सेवेमध्ये अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित मेजर ( निवृत्त ) पी. एम. भगत (गौरवसेनानी ) यांचे आज ( दि. ३० ) सकाळी ७ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. १९९९ मध्ये कारगिल येथे पथकाचे नेतृत्व आणि संवेदनशील काळात श्रीनगर येथे विभागप्रमुख म्हणून केलेले काम वैशिष्ट्यपूर्ण होते .
इंडियन रेडक्रॉस सोसायटी , नाशिक जिल्हा शाखेचे सचिव म्हणून २००६ ते २०२० या काळात त्यांनी अतिशय धडाडीने काम करून नाशिक रेडक्रॉस ला उर्जितावस्थेत आणले . विद्यमान कार्यकारिणीत कोषाध्यक्ष या नात्याने ते अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते . ग्राहक संरक्षण क्षेत्रात देखील त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे . सायंकाळी पाच वाजता नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . तत्पूर्वी त्यांचे पार्थिव रेडक्रॉस इमारत , रविवार कारंजा , नाशिक येथे काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले . रेडक्रॉस येथेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . मेजर भगत यांचे निधन ही केवळ नाशिक रेडक्रॉस साठीच नव्हे तर समस्त मानवतावादी आणि विशेषकरून ग्राहक संरक्षण चळवळीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
त्यांचे पश्चात पत्नी प्रतिभा , यशोधन आणि प्रा. अनिरुद्ध ही मुले , सुना , नातवंडे असा परिवार आहे . सी. ए. भूषणा भगत तसेच हर्षदा भगत यांचे ते सासरे होत.
शुक्रवारी शोकसभा
त्यांचे आकस्मिक निधनाबद्दल शुक्रवारी ( १ ऑगस्ट ) सायंकाळी चार वाजता रेडक्रॉस येथे शोकसभा आयोजित करण्यात आली असून उपस्थित राहण्याचे आवाहन रेडक्रॉस आणि विविध संस्थांनी केले आहे .
Comments are closed.