** एनजीएन नेटवर्क
प्रदीर्घ काळ पोलीस सेवेत आणि अल्प काळ राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य राहिलेल्या प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मूळ बागलाण तालुक्यातील निताणे गावचे सुपुत्र असलेले दिघावकर पोलीस सेवेतील अखेरच्या टप्प्यात नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत राहिले. बड्या पदावर आणि तेदेखील पोलीस खात्यात असूनही सर्वसामान्यांना सहजपणे भेटणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती राहिली. याकाळात त्यांनी द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारी वर्गाकडून होणारी फसवणूक रोखली. शेकडो जणांना न्याय मिळवून दिला. म्हणूनच एक लोकाभिमुख अधिकारी म्हणून त्यांची छबी तयार झाली. त्याच काळात त्यांची पावले राजकारणाकडे वळणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांनी राजकीय वहिवाट चोखाळणे ही तशी नवी बाब नाही. त्यामुळे दिघावकर यांनी सुरु केलेली नवी इनिंग अनपेक्षित समजण्याचे कारण नाही. त्यांनी चौफेर वारू उधळणाऱ्या भाजपची त्यासाठी निवड करणे हे खरे तर त्यांच्यातील सूज्ञपणाचे लक्षण मानायला हवे. गेल्या काही वर्षांत देशाच्या पायाभूत सुविधा तसेच ‘जीडीपी’तील सुधारणांचा आपल्यावर प्रभाव पडल्याचे सांगत दिघावकरांनी आपल्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे. शिवाय, सर्जिकल स्ट्राईकमुळे देशाची ‘सॉफ्ट स्टेट’ म्हणून असलेली प्रतिमा मोदी यांच्या काळात बदललल्याचे आणि एकूणच भारताची प्रतिमा उंचावत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात दिघावकर यांची पक्ष निवड करण्यामागे ‘हिडन अजेंडा’ मुळीच नाही असे म्हणणे अगदीच राजकीय अजाणतेपण दाखवल्यागत होईल. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप ‘इलेक्टीव मेरीट’ असलेल्या उमेदवारांच्या शोधात आहे. त्यानुषंगाने ‘परस्परावलंबीत्वा’च्या तत्वानुसार दिघावकरांनी भाजपचा आणि भाजपने दिघावकरांचा स्वीकार केला असे म्हणणे योग्य ठरावे.
मतदारसंघ पुनर्रचनेपासून धुळे लोकसभा क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. प्रतापदादा सोनवणे यांच्यानंतर डॉ. सुभाष भामरे यांनी सलग दोनदा इथे कमळ फुलवले. डॉ. भामरे यांची मोदी पर्वाच्या प्रथमोध्यायात थेट संरक्षण राज्यमंत्री म्हणून लागलेली वर्णी धुळे मतदारसंघाला राष्ट्रीय स्तरावर ओळख देवून गेली. तथापि, द्वितीयोध्यायात डॉ. भामरे मंत्रीपदाचा करिष्मा टिकवू शकले नाहीत. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, ग्रामीण आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा क्षेत्र व्यापतात. भाजपला येनकेन प्रकारे हा गड राखायचा आहे. डॉ. भामरे तिसऱ्यांदा बाजी मारतील, याबाबत पक्षश्रेष्ठी नसले तरी कार्यकर्ते साशंक आहेत. याच अनुषंगाने दिघावकर यांनी ‘टायमिंग’ साधल्याचे बोलले जात आहे. भूमिपुत्र, कोरी पाटी, आर्थिक सुबत्ता, कार्यकर्त्यांची मोठी फळी या बलस्थानांमुळे उद्याच्या स्पर्धेत दिघावकर यांनी श्रेष्ठींची पसंती मिळवली तर आश्चर्य वाटावयास नको. धुळ्यात सहापैकी प्रत्येकी दोन आमदार भाजप आणि एमआयएमचे तर प्रत्येकी एक शिवसेना तसेच कॉंग्रेस पक्षांचे आहेत. बरं, अशी स्थिती असली तरी लोकसभा निवडणुकीची समीकरणे वेगळी असल्याचा लाभ भाजप उमेदवाराला होण्याची तिसऱ्यांदा होण्याची दाट शक्यता आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण याबाबत जेव्हढी उत्कंठा आहे, तेव्हढेच औत्सुक्य विरोधकांच्या उमेदवाराबाबत असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अद्वय हिरे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मुस्लीम मतदारांची लक्षणीय संख्या पाहता कॉंग्रेस देखील या जागेवर हक्क सांगू शकते. इथली लढत भाजप विरुध्द महाविकास आघाडी अशी होणार असली तरी ती प्रत्यक्षात पालकमंत्री दादा भुसे विरुध्द अद्वय हिरे यांच्यात होईल, हे निर्विवाद सत्य आहे. ‘निवडणूक व्यवस्थापन’ शास्त्रात पारंगत असलेले भुसे यांच्यासाठी लोकसभा निवडणूक ‘लिटमस चाचणी’ ठरणार असल्याने ते अवघी प्रतिष्ठा पणाला लावतील. भुसे यांची मालेगाव मध्यचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती यांच्याशी असलेली जवळीक निवडणुकीत नेमकी कितपत निर्णायक ठरते, हादेखील कळीचा मुद्दा ठरणार आहे. याच अनुषंगाने भाजप डॉ. भामरे यांना पुन्हा चाल देतो की भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतो, यावर पुढील समीकरणे अवलंबून राहतील.
सारांशात, डॉ. भामरे यांना भाजप एकाएकी बाजूला सारण्याची स्थिती नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भामरे यांची जवळीक पाहता ते सहजसाध्यही नाही. तथापि, धक्कातंत्रात आघाडीचा पक्ष असलेला भाजप वेगळा निर्णय घेवू शकतो. याच अनुषंगाने ‘प्लान बी’ म्हणून दिघावकर यांचा पक्षप्रवेश करून घेतला असावा. दिघावकर यांच्या भाजप प्रवेशाला खासदारकीच्या स्वप्नाची झालर असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. आठ महिन्यांवर येवून ठेपलेल्या निवडणुक तिकिटासाठी धुळ्यात डॉ. भामरेंची सरशी होते की दिघावकरांना प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतरवले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.