नाशिक/एनजीएन नेटवर्क
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने मुलाला हाताशी घेऊन आपल्याच पतीच्या डोक्यात मुसळी घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगरमध्ये आज पहाटेच्या दरम्यान घडली आहे. दादाजी गवळी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आपल्या पतीचे मेहूण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पत्नी आणि मुलाला होता. यावरुन घरात सतत भांडणं होत होती. याचाच राग दोघांच्या मनात होता. याबाबत कुटुंबीयांनी एकत्र बैठक घेऊन काही दिवसापूर्वी हा विषय बैठकीत घेतला होता. तेव्हाच बैठकीत हा विषय संपवला होता. त्यावेळी त्यांनी पुन्हा असे घडणार नाही, असे अश्वासन देत वाद मिटवला होता. तसंच, ते पत्नीला पैसे देत नसल्याने दोघांमध्ये छोट्या-मोठ्या कुरबुरी सुरुच होत्या.
ताकीद देऊनही आणि वाद विवाद झाल्यानंतरही प्रत्यक्षात गवळी यांनी अफेअर सुरुच ठेवले असल्याचे पत्नी आणि मुलासमोर आले. पत्नीला पुन्हा त्यांच्या अनैतिक संबंधांबाबत कळताच ती संतापली. गुन्हा घडला त्याच्या आदल्या रात्री त्यांच्यात वाद झाले होते. त्यांच्यातील भांडण टोकाला गेले होते. त्यामुळं संतापाच्या भरात दोघांनी मिळून दादाजी गवळी यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे. पोलिसांनी माय-लेकांना तात्काळ ताब्यात घेतला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता गवळी व मुलगा विशाल गवळी असं अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत.