जालना/एनजीएन नेटवर्क
मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील तळणी- मंठा भागात समोर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या 24 जून रोजी कारमध्ये आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. या कारला आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती. मूल होत नसल्याचा राग डोक्यात असल्याने पतीनंच हे भयंकर कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सविता अमोल सोळंखे असे मृत महिलेचे नाव असून दोघांचे लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हते. अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास द्यायचा. वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत होता. मात्र त्याला सविता नकार देत होती. याचाच राग मनात धरून पती अमोलने पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.