नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
क्रिकेट विश्वाला सध्याच्या घडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण पहिले दोन वनडे विश्वचषक जिंकणार वेस्ट इंडिजचा संघ आता ODI World Cup 2023 मधून बाहेर पडला आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत वेस्ट इंडिजचा स्कॉटलंड पराभव केला आणि त्यामुळे भारतातील विश्वचषकात खेळण्याचे त्यांचे स्वप्न आता धुळीस मिळाले आहे. वेस्ट इंडिजच्या संघावर ही नामुष्की पहिल्यांदाच ओढवली आहे.
भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण वेस्ट इंडिजचा संघ मात्र आता भारतामधील विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सध्याच्या घडीला विश्वचषकासाठी पात्रता फेरी सुरु आहे. या फेरीत वेस्ट इंडिजला यापूर्वी झिम्बाम्वेच्या संघाने मोठा धक्का दिला होता. पण आता तर क्रिकेट विश्वात लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे आणि या पराभवानंतर ते आता भारतामधील होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. स्कॉटलंडच्या या सामन्यात वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी होती. या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांचा अर्धा संघ फक्त ६० धावांत गारद झाला होता. पण त्यानंतर जेसन होल्डरने ४५ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच त्यांना १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. पण त्यानंतर स्कॉटलंडने मात्र साह विकेट्स राखत हा सामना सहजपणे जिंकला आणि त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ हा भारतातील विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.