घोटी/राहुल सुराणा
रानमेवा विक्रीसाठी आलेल्या अल्पवयीन युवतीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिचे जळगाव जिल्ह्यात लग्न लावून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी घोटी पोलिसात कासोदा (ता एरंडोल, जि जळगाव) येथील संशयित महिला , तिचा पती यांच्यासह ज्याच्याशी लग्न लावून तो युवक अशा तिघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील वैतरणा मार्गावरील भावली परिसरातील येथील एक अल्पवयीन युवती घोटी येथे रानमेवा विक्रीसाठी आली असता संशयित महिलेने तिच्याशी ओळख करून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला फूस लावून आपल्यासोबत नेत जळगाव जिल्ह्यात नेले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील एका इसमाशी लग्न लावून दिले याबाबत संशयित महिला श्रीमती सुरेखा योगेश पाटील, योगेश शांताराम पाटील व मनोज राजू शिंपी तिघेही (रा कासोदा ता एरंडोल जि जळगाव ) यांच्याविरोधात घोटी पोलिसात कलम 363,366(अ) सह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेतले आहे
दरम्यान संबंधित तिघेही संशयित शनिवार (दि.८ ) रोजी सकाळी त्या मुलीला सोबत घेऊन दाखल घेण्यासाठी तिच्या घरी आले असता तिच्या पालकांनी याबाबत पोलिसात माहिती दिली. एल्गार कष्टकरी संघटनेच्या पुढाकारातून व तत्परतेने घोटी पोलिसाना याबाबत माहिती देण्यात आली. घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांना ताब्यात येऊन चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार गोतुरने हे करीत आहेत.