नाशिक/एनजीएन नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तब्बल 68 टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांद्वारे देण्यात आली. सर्वाधिक पाणी टंचाई नांदगाव तालुक्यात निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात तब्बल 68 टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात असून ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट आहे. नांदगावी सर्वाधिक गाव, वाड्या- वस्त्यांवर फेऱ्या सुरु आहेत. येवला, मनमाड, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांत दरवर्षी पाणीटंचाई समस्या भेडसावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील नांदगाव 18, येवला 16, चांदवड बारा, मालेगाव बारा, देवळा पाच, बागलाण पाच अशी तालुकानिहाय टँकरची संख्या आहे.