NGN News
Latest Marathi News

भाजप शहराध्यक्षांच्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत सुंदोपसुंदी ?

  • स्थानिक नेतृत्व विरुध्द मंत्री गिरीश महाजन असे चित्र; केदार यांना काही तासांत ‘यु टर्न’

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महापौर -उपमहापौर पदांसाठी प्रदेश पातळीवरून आलेली नावे ऐनवेळी बदलून त्यासाठी अनुक्रमे हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी बहाल करण्याचा मंत्री गिरीश महाजन यांचा निर्णय हेच भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे कारण असल्याची माहिती पुढे आली आहे. केदार यांनी काही तासांतच ‘यु टर्न’ घेत राजनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले असले तरी भविष्यात नाशिक भाजपमधील सुंदोपसुंदी थांबणार काय, असा प्रश्न निष्ठावंत उपस्थित करीत आहेत.

अनेक वादग्रस्त चेहरे असलेल्या आयारामांचा पक्षप्रवेश, तिकीट वाटप प्रक्रिया, एबी फॉर्म्स वाटपाचा घोळ अशा एक न अनेक कारणांनी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. अशा परिस्थितीतही पक्षाला नाशिक महापालिकेत एकहाती सत्ता प्राप्त झाली. त्यानंतरही महापौर -उपमहापौर पदाचे उमेदवार निश्चित करण्यावरून स्थानिक नेतृत्व आणि मंत्री महाजन यांच्यात धुसफूस सुरूच राहिली. मंगळवारी मंत्री महाजन यांनी या पदांसाठी हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप यांची नावे जाहीर केली आणि वादाला तोंड फुटले. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने पाठवलेल्या नावांमध्ये बदल करून वेगळीच नावे जाहीर केल्याचा मुद्दा केदार यांना खटकल्याचे बोलले जात आहे. याबाबत प्रदेश नेत्यांनी दखल घेत केदार यांचे मन वळवल्याने त्यांनी राजीनामा मागे घेतला.

तूर्तास हा वाद शमला असला तरी स्थानिक आमदार -पदाधिकारी आणि मंत्री महाजन यांच्यात अनेक मुद्य्यांवर मतभेद असल्याचे लपून राहिलेले नाही. पुढील पाच वर्षे नाशिककरांना दिलेली आश्वासने पाळण्यासाठी खरेतर मतैक्य अपेक्षित असताना हे विखुरलेपण पक्ष हिताचे नसल्याची भावना पक्षात आहे. यासंदर्भात आगामी काळात सुधारणा होतात का, याकडे निष्ठावंतांचे लक्ष लागून राहणार आहे.

महापौर-उपमहापौरपद सव्वा वर्षाचे

दरम्यान, पाच वर्षांतील सत्तेत अधिकाधिक जणांना सामावून घेण्याच्या उद्देशाने मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही महापौर -उपमहापौर पद सव्वा वर्षाचे असणार आहे. याचा अर्थ आगामी काळात नाशिकला चार महापौर-उपमहापौर मिळणार आहेत. पक्षांतर्गत वादावर श्रेष्ठींनी हा तोडगा काढल्याची चर्चा आहे. उद्या शुक्रवारी ( दि. ६ ) नाशिकच्या महापौर-उपमहापौर पदांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

Comments are closed.