त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्र्यंबक देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. आजपासून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार आहे. केवळ केंद्र आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांना दर्शन दिले जाणार आहे.
अधिक मास आल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. पाऊस सुरू असतानाही भाविकांची रीघ सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपासून व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा रांगेत उभे असलेल्या भाविकांना दर्शनासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र होते. याच पार्श्वभूमीवर ट्रस्टने उपरोक्त निर्णय घेतला आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.
दर्शनबारीत भाविकांना सुविधांचे संपुट..
दर्शनबारीतील भाविकांसाठी त्र्यंबक देवस्थान प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दर्शनबारीत भाविकांना तासनतास उभे राहावे लागते, यात आबालवृद्धांसह लहान मुलेही उभी असतात. अशावेळी तहान लागणे, भूक लागणे अनेकदा भाविकांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास दूर करण्यासाठी मंदिर ट्रस्ट विश्वस्तांनी भाविकांसाठी दर्शनानंतर राजगिरा लाडू देण्यात येणार आहेत. तसेच रांगेत बिस्कीट पुडे, पाण्याची बाटली मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.