पंढरपूर/एनजीएन नेटवर्क
भाविकांना दर्शन देण्यासाठी आता सावळा विठूराया २४ तास उभा राहणार आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचे नवरात्र सुरु होत असल्याने परंपरे नुसार देवाचा चांदीचा पलंग काढून त्या पाल्नागाची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच विठूराया आणि रुक्मिणीमातेला थकवा जाणू नये म्हणून पाठीला कापसाचा लोड लावण्यात आला. याकाळात म्हणजेच ७ जुलै पर्यंत देवाचे २४ दर्शन तसेच सुरु राहणार असून व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना हजारो भाविकांनी पंढरी नगरी फुलून गेली आहे . संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्याच्या समीप आल्या आहेत. अशातच शेकडो वर्षाच्या परंपरे नुसार सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला . यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या . देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले . आजपासून देवाचे काकडा आरती, पोशाख,भूपार्ती, शेजारती इत्यादी राजोपचार काही दिवसापुरते बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे .