NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

विद्योत्तमा फाउंडेशनच्या वतीने नाशकात दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शन

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

येथील विद्योत्तमा फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी हिंदी पंधरवडा साजरा केला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत येत्या १६ आणि १७ सप्टेंबर दरम्यान पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक एड.मिलन खोहर आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी दिली.

सदर प्रदर्शन सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहिती देताना एड. खोहर आणि कुलकर्णी म्हणाले, मराठी आणि हिंदी लेखकांना आपल्या पुस्तकरुपी साहित्यासाठी योग्य आणि विश्वसनीय व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी १६ आणि १७ सप्टेंबर रोजी हे प्रदर्शन घेण्यात येणार आहे. यामध्ये मराठी आणि हिंदी भाषांमधील पुस्तके विक्रीला ठेवण्यात येतील. अनेकदा प्रतिभा संपन्नता असूनही लेखकांना वाचकांपर्यंत पोहचणे शक्य होत नाही. त्यांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार होत नाही. प्रदर्शनाच्या माध्यमातून लेखक आणि त्यांचे साहित्य यांना वाचकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

या अनुषंगाने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील हिंदी आणि मराठी साहित्यिक, कवी, लेखक यांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपले पुस्तकरूपी साहित्य नमुना स्वरुपात (चार संख्येत) तसेच प्रवेश शुल्क स्वरुपात रु. ५००/- येत्या १० सप्टेंबरपर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत. त्याशिवाय पुस्तक प्रदर्शनात सहभागी केले जाणार नाही याची नोंद घावी. पुस्तके पाठविण्याचा पत्ता : सुबोधकुमार मिश्र, शांभवी बंगला, मंगलमुर्ती नगर, कनाल रोड, नासिक रोड -422101 ( फोन/गुगल पे नंबर 9422759050 )

महत्वाचे निवेदन..

@ पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून लेखक म्हणून आपला परिचय लोकांपर्यंत पोहचावा हाच आमचा प्रयत्न आहे. यासाठी आपण स्वतः उपस्थित राहून आमचे प्रयत्न यशस्वी करावेत. तथापि, आपल्या प्रवासाची, राहण्या-खाण्याची व्यवस्था आपणास स्वतः करावी लागेल. पुस्तक विक्रीची कोणतीही जबाबदारी आमची संस्था घेत नाही. मात्र पुस्तक विक्री झाली तर रक्कम लेखकाच्या खात्यात जमा केली जाईल. लेखकांचा परिचय समाज, वाचक,  विद्यार्थी इत्यादींशी व्हावा, याच प्रामाणिक उद्देशाने या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन संस्था करत आहे, असेही संयोजक एड.मिलन खोहर आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.