मुंबई/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ पत्रकार, सिने तसेच क्रिकेट समीक्षक, चतुरस्त्र लेखक शिरीष कणेकर यांचे आज निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे आज सकाळी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हृदयविकाराच्या धक्क्याने तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ‘लगाव बत्ती’ ‘कणेकरी’ ‘ फिल्लमबाजी, ‘ ‘शिरीषासन ‘ ‘शिणेमा डॉट कॉम’ यासह त्यांची अनेक पुस्तके आणि ललितलेख मराठी जनांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील.
शैलीदार, खुसखुशीत लेखन ही शिरीष कणेकरांची ख्याती. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील, त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’ व ‘कणेकरी’ या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण त्यांनी केले. त्याला प्रेक्षकांचा आणि कलाकारांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. शिरीष मधुकर कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील पेण हे त्यांचे मूळ गाव होते. शिरीष कणेकर यांचे वडील विख्यात डॉक्टर असल्याने त्यांचं बालपण भायखळा येथील रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले. कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए.एलएलबी केले.
इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल, डेली, सिंडिकेट प्रेस न्यूज एजन्सी या वर्तमानपत्रांसाठी त्यांनी काम केलं होतं. तसेच मुख्यत: मराठी वृत्तपत्रांतून त्यांची अनेक सदरे गाजली. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, पुढारी, लोकमत , साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली (इंग्रजी) या सर्वांसाठी त्यांनी अनेक स्तंभलेख लिहिले.
———————————–
@ भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या क्रिकेट व सिनेमा या विषयांवर, तसेच राजकारणावर विविध माध्यमांतून लेखन करणारे ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! एक उत्तम कथाकथनकार, पत्रकार आणि विनोदी व खास शैलीतील लेखनातून आपला वेगळा ठसा उमटविणारा दिलखुलास लेखक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
- छगन भुजबळ
मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य