नाशिक/एनजीएन नेटवर्क
नवीन नाशिक परिसरातील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील एका भाजी विक्रेत्याचा गुरुवारी सायंकाळी खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संदीप आठवले असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून संदीपवर सहा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने छातीत व पोटात व मानेवर तब्बल 25 पेक्षा जास्त वार करुन ठार मारल्याची घटना घडली आहे.
संदीपच्या या निर्घृण खूनानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, हा खून का व कशासाठी करण्यात आला आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हत्या झालेला युवक रस्त्याच्या कडेला उभा असतानाच पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर सपासप वार केले. लोकांची रहदारी सुरू असतानाच टोळक्यांनी युवकावर निर्घृणपणे हल्ला केला. तरुण खाली कोसळेपर्यंत या टोळक्यांनी त्याच्यावर सपासप वार करणे चालुच ठेवले. तरुण खाली कोसळल्यानंतर टोळक्याने तिथून पळ काढला. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या गुरुवारी हे हत्येचे सत्र घडल्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.