यवतमाळ/एनजीएन नेटवर्क
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आले, पण काँग्रेसला सध्या थांबवले आहे, असे वक्तव्य लासलगाव येथे करत गिरीश महाजन यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून दिली आहे. दरम्यान, महाजन यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. गिरीश महाजनांच्या 20 पिढ्या आल्या तरी राज्यात काँग्रेसला फोडू शकणार नाही, असा पलटववार वडेट्टीवार यांनी केला आहे.
लासलगाव येथे दौऱ्यावर असताना मंत्री गिरीश महाजन यांनी उपरोक्त वक्तव्य केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत. सर्व पक्ष तर मला इथेच दिसत आहेत. जे असतील नसतील ते, कुणी सुटलेले नाही. शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे. आता काँग्रेसपण येईल, पण काँग्रेसला सध्या थांबवलेले आहे, असे म्हणत महाजन यांनी एक प्रकारे कॉंग्रेसमधील फुटीचे संकेत दिले आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मुंगेरीलाल के हसीन सपने, तशी गोष्ट आहे. गिरीश महाजन काय, त्यांच्या 20 पिढ्या आल्या तरी राज्यात काँग्रेसला फोडू शकणार नाहीत एवढे दाव्यावने मी सांगतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. आता महाजन त्यांना काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.