मुंबई/एनजीएन नेटवर्क
दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवन पटावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरल्यानंतर ‘धर्मवीर २’ आणण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानुसार, येत्या नोव्हेंबर महिन्यात ‘धर्मवीर २’चे चित्रीकरण सुरू होणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाईच करणार आहे. ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
याबाबत निर्माता मंगेश देसाई म्हणाला, की ‘अंदाजे नोव्हेंबर महिन्यात ‘धर्मवीर २’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन आपले साहेब आहेत. दिघेसाहेबांच्या काही गोष्टी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमात दाखवण्यात आल्या होत्या. पण, तरी त्यांच्या अनेक गोष्टी वेळेच्या मर्यादेमुळे सिनेमात दाखवण्यात आल्या नाहीत. या दोन्ही साहेबांचा अजेंडा हा ‘हिंदुत्व’ हा होता. त्यामुळे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ‘धर्मवीर २’मध्ये दाखवण्यात येणार आहे. साहेबांचं चरित्र दाखवताना दोन भाग नव्हे, तर चार भागही पुरणार नाहीत एवढ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. त्यांच्या अनेक गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत.’ या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेता प्रसाद ओक शीर्षक भूमिकेत दिसणार आहे हे नक्की. चित्रपटाच्या कथानकाविषयी प्रेक्षकांनाही उत्सुकता असेल.