लासलगाव : राकेश बोरा
कांद्यासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या लासलगावात शासकीय यंत्रणा केवळ कागदावरच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महावितरणचे शहर अभियंता, तलाठी, सर्कल अधिकारी, ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, आगार व्यवस्थापक, सब-रजिस्ट्रार, बँक कर्मचारी अशा विविध विभागांचे अधिकारी मुख्यालयी न राहता नाशिक किंवा इतर ठिकाणांहून दररोज ‘अप-डाऊन’ करत असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे शासकीय कामांचा खोळंबा होऊन विकासाला खीळ बसत असल्याची तीव्र नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
नियमानुसार बदली झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी नियुक्त ठिकाणी स्थायिक होणे बंधनकारक आहे. मात्र लासलगावात या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बहुतांश अधिकारी सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात आणि दुपारच्या सत्रात कधीही निघून जातात. यामुळे कार्यालयीन उपस्थिती केवळ कागदोपत्रीच उरते. कामांची वेळेत पूर्तता होत नाही, फायली प्रलंबित राहतात आणि सामान्य नागरिकांना आपल्या तक्रारी घेऊन वारंवार चकरा माराव्या लागत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे.
या ‘अप-डाऊन’ संस्कृतीमुळे लासलगावच्या विकासावर आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. “शासकीय अधिकारी जर ‘निवासी’ नसेल, तर जनता कोणाकडे धाव घ्यायची?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या गंभीर समस्येकडे शासनाचे आणि संबंधित विभागांचे तातडीने लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.
———————————-
शेतकरी वर्ग सकाळी लवकर कामाला लागतो. पण इथे अधिकारी ११ नंतर येतात आणि लवकर निघून जातात. शेतकऱ्यांच्या अर्ज-विनंत्यांकडे दुर्लक्षच होतंय. दूरवरून येणाऱ्या अधिकाऱ्यांची सततची घाई दिसते. मुक्कामी न राहत असल्यामुळे अर्ज व तक्रारींकडे दुर्लक्षच होतं.”
शिवा पाटील सुरासे, माजी सभापती , पंचायत समिती निफाड
कोणतेही कामं असोत किंवा रेशनकार्डची, प्रत्येक कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. कधी अधिकारी नसतात तर कधी भेटले तर लवकर काम होत नाही. हे अधिकारी इथेच राहिले तर आमची कामं वेळेत होतील आणि आम्हाला इतका त्रास होणार नाही.”
(त्रस्त महिला, लासलगाव)
————————-
महावितरण च्या “अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या या ‘अप-डाऊन’ पद्धतीमुळे अनेक कामांना विलंब होत आहे. स्मार्ट मीटर ,सुरक्षित ठेव ,योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. जर अधिकारी इथेच मुक्कामी राहिले तर त्यांना गावातील समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजतील आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतील.”
(राजेंद्र चाफेकर, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा ,लासलगाव.)
Comments are closed.