NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नसती लगीनघाई, फुकाचा उतावीळपणा ! (सारीपाट/मिलिंद सजगुरे)

0

  ** एनजीएन नेटवर्क

निर्धारित वेळ गृहीत धरली तर लोकसभा निवडणुका आतापासून आठ महिने दूर आहेत. अशातच नाशिकमध्ये राजकीय लगीनघाई सुरु झाली आहे. याबाबत कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील उतावीळपणा दखलपात्र ठरावा. वास्तविक, राज्यस्तरावर या दोन्ही पक्षांतील नेते गळ्यात गळे घालून ऐक्याच्या ‘वज्रमुठी’चा डांगोरा पिटत असताना इथे मात्र मैदानात उतरण्यापासून मैदान मारण्याच्या गप्पांचे फड स्थानिकांमध्ये रंगू लागले आहेत. कॉंग्रेसला नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा लढायच्या आहेत, तर ठाकरेंच्या सेनेने नाशिकपुरता तर उमेदवारही जाहीर करून टाकलाय. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी आघाडीतील इतर दोन पक्षांच्या मतांना फार किंमत न देता आपापले इरादे स्पष्ट करणे गोंधळ निर्माण करणारे आहे. शिवाय, येणारी निवडणूक पालिका प्रभागाची नव्हे तर लोकसभेची आहे, याचा दोहोंनाही विसर पडला की काय, अशी स्थिती आहे.

  लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने बैठक घेवून जिल्ह्यातील दोन्ही जागा लढवण्याचा स्पष्ट इरादा जाहीर केला आहे. निरीक्षक डॉ. उल्हास पाटील यांनी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा क्षेत्रांवर दावा ठोकला आहे. सहकारी दोन्ही पक्षांत उभी फूट पडूनही आम्ही मात्र ऐक्य राखल्याच्या अंतस्थ भावनेने उचंबळलेल्या कॉंग्रेस पक्षाचा उत्साह समजण्याजोगा असला तरी मैदानात प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेण्याची तसदी पाटलांनी घेतली असती तर ते अधिक राजकीय परिपक्वतेचे लक्षण ठरले असते. मुळात ज्यांच्याविरोधात लढायचे, ते आपल्याहून किती प्रबळ आहेत, याचा कॉंग्रेस नेत्यांनी ठाव घ्यायला हवा. खिळखिळे झालेले पक्ष संघटन, हरवलेला जनाधार, निष्ठावंत नेते-कार्यकर्त्यांची वानवा, सहकारी पक्षांचे कितपत सहकार्य लाभेल आदी अंगांनी बैठकीत चर्चा अपेक्षित असताना खानदेश सुपुत्राने थेट जागा लढवण्याचा जाहीर केलेला इरादा स्वकीयानांच आचंबित करणारा ठरावा. स्वबळाचे दिनू संपून आता युती-आघाडीचा जमाना आला आहे. लोकसभेत दोनदा पाशवी बहुमत प्राप्त केलेल्या भाजपलाही आता मित्रपक्ष आठवू लागले आहेत. कॉंग्रेस तर किती विकलांग झाली आहे, हे सांगण्याची गरजच पडू नये. असे असताना सहकारी पक्षांना विश्वासात न घेता दोन्ही जागा लढवण्याचा निर्धार अव्यवहार्य आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणाराच म्हणावे लागेल.  

करंजकरांची उमेदवारी निष्ठेच्या कसोटीवर..

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडाने होरपळलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटानेदेखील दोन्ही जागा लढण्यासाठी कंबर कसली आहे. पैकी नाशिकच्या जागेवर त्यांनी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव जाहीर करून आत्मविश्वास हरवलेल्या कार्यकर्त्यांत ‘उमेद’ जागवण्याची खेळी खेळली आहे. विद्यमान खासदारांना स्वतःच्याच क्षेत्रात जखडून ठेवायचे ठाकरेंचे धोरण असावे. शिवाय, शिंदे यांच्याकडे जाणाऱ्यांचा राबता लक्षात घेवून आम्ही निष्ठेचा असाही सन्मान करतो, हे करंजकर यांना उमेदवारी जाहीर करून ‘मातोश्री’ने दाखवून दिले आहे. गेल्या वेळची आणि आताची परिस्थिती यामध्ये मोठी तफावत आहे. शिवसेनेला उभा छेद जावून नेते आणि कार्यकर्त्यांची वाटणी झाली आहे. केंद्र सरकार म्हणून मोदी यांच्या नेतृत्वाची जादू आजही टिकून आहे. सोबतच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही सवतासुभा झाला असला तरी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वासह लोकसभा क्षेत्रात येणारे तीन विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेस आघाडीच्या ताब्यात आहेत. शिवसेनेचा एकही आमदार नाही. पक्ष संघटन जेमतेम राहिले आहे. दिवंगत उत्तमराव ढिकले आणि  राजाभाऊ गोडसे तसेच अलीकडील दोन निवडणुकांत हेमंत गोडसे यांनी आजवर शिवसेनेला नाशिकमध्ये खासदारकी मिळवून दिली. तथापि, या सर्वांनी विजय मिळवला तेव्हा भाजप सोबत होता, ही जमेची बाजू होती. शिवाय, या तिघांनी उभारलेल्या विजयाच्या गुढीला प्रत्याक्षाप्रत्यक्ष अनेकांचा ‘हात’भार लागल्याचे नाकारता येणार नाही. हेमंत गोडसे यांना दोनदा विजयपताका फडकावताना मूळ शिवसेनेच्या किती जणांनी मनापासून मदत केली, हा संशोधनाचा विषय ठरावा. तात्पर्य, पक्षाला खासदारकीच्या चार टर्म बहाल करताना या तीनही नेत्यांचा विजय हा शिवसेनेचा कमी आणि वैयक्तिक स्तरांवर अधिक होता.

 विजय करंजकर लढाऊ बाण्याचे आहेत, त्यांनी ठाकरेंची निष्ठा सोडलेली नाही. याच कारणाने जिल्हाप्रमुख या नात्याने पक्षातील एक व्यापक चेहरा म्हणून त्यांना ठाकरेंनी पसंती दर्शवली असावी. तथापि, विजयपथाद्वारे ‘दिल्लीचे द्वार’ उघडण्यासाठी त्यांना घाम गाळण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागणार आहे. आज मतदाराची मानसिकता बदलली आहे. त्याला विकासाची भाषा कळू लागली आहे. भावनिक राजकारणाला जेमतेम थारा राहिला आहे. तूर्तास तरी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची स्थिती आहे. त्याला भाजपचा फार विरोध होण्याची शक्यता नाही. कारण भाजपच्या दृष्टीने मोदींना पुन्हा पदावर बसवण्यासाठी ‘नंबर गेम’ महत्वाचा आहे. शिवाय, शिंदेंच्या सेनेत गोडसे यांच्याशिवाय दुसरा विश्वासार्ह चेहराही नाही. या बाबी लक्षात घेता महाविकास आघाडीने करंजकर यांची उमेदवारी मान्य केली तर नाशिकमध्ये कधीकाळी खांद्याला खांदा लावून ‘मातोश्री’साठी जीवाचे रान करणाऱ्या हेमंत गोडसे आणि विजय करंजकर यांच्यात नाशिक लोकसभा जागेच्या दावेदारीसाठी घमासान होणे अपरिहार्य ठरणार आहे. दिंडोरीचा हिशेब करण्यास अजून बराच काळ जाणार असल्याने तूर्तास नाशिक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ राहणार आहे, हे निश्चित !

सारांशात, कॉंग्रेस काय किंवा ठाकरेंची शिवसेना, लोकसभेत उमेदवार विजयासाठी शंखनाद करून बसले तरी दोहोंना ही लढाई सोपी नाही. तीन पक्षांचा सामूहिक अजेंडा न राबवता एककल्लीपण अधोरेखित करून दोन्ही पक्षांनी धोरण विसंगतीला हरताळ फासण्याचे काम केले आहे. ही नसती लगीनघाई आणि फुकाचा उतावीळपणा दोन्ही पक्षांच्या मूळावर उठणार नाही म्हणजे झाले..            

Leave A Reply

Your email address will not be published.