NGN News
Latest Marathi News

सर्वव्यापीपण अव्हेरले अन ‘माणिक’ झाकोळले.. ( सारीपाट/मिलिंद सजगुरे)

** एनजीएन न्यूज नेटवर्क

आक्रमकता आणि महत्वाकांक्षा हे स्वभावगुण यशाची शिडी सर करण्यासाठी फार वेळ घेत नाहीत, या राजकारणातल्या अलिखित वस्तुपाठाचा आजवर मराठी मुलखात अनेकांनी शत-प्रतिशत अवलंब केला. तथापि, जेव्हा-जेव्हा हे स्वभावगुण ‘अति’ नामक उपसर्गाने जोडले गेले, तेव्हा-तेव्हा परतीच्या प्रवासाचे प्रत्यंतर त्यापैकी अनेकांना आले. सिन्नरच्या माणिकराव कोकाटे यांचा दाखला यापेक्षा वेगळा नाही. जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री हा चढ्या राजकारणाचा त्यांचा प्रवास वाद-विवादाच्या खाच-खळग्यांनी ओतप्रोत भरलेला राहिला. तथापि, त्यापासून धडा घेऊन सर्वव्यापी राजकारण करणे अव्हेरले आणि सिन्नरचे हे ‘माणिक’ मंत्रिपद गमवावे लागल्याने झाकोळले गेले.

ज्या दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष साथीने सिन्नरच्या राजकारणात कोकाटे यांनी बस्तान बसवले, त्या दिघोळे आणि त्यांच्या वारसदारांनी कायदेशीर लढ्याद्वारे कोकाटेंच्या राजकीय वाटचालीला सुरुंग लावला. विद्यार्थीदशेपासून आक्रमक, अभ्यासू आणि लढवय्यी वृत्ती असलेल्या कोकाटे यांनी अनिश्चिततेच्या राजकीय हिंदोळ्यावर हेलकावे घेत कधी दिघोळे, कधी गडाख, कधी शिंदे तर कधी वाजे घराण्यांसोबत सख्य ठेवले. तालुक्यातील मराठा-वंजारी सुप्त वादाचा लाभ उठवत कोकाटे राजकारणाच्या पायऱ्या चढत गेले. नव्वदीच्या दशकात जिल्हा परिषद सदस्य झालेल्या कोकाटे यांचे नेतृत्वगुण त्यांना थेट आमदारकीचा मुकुट बहाल करण्याचे मूळ ठरले. १९९९ मध्ये राज्यमंत्रीपद उपभोगलेल्या तुकाराम दिघोळे यांना धोबीपछाड देत कोकाटे ‘जायंट किलर’ ठरले. त्यानंतर २०१४ चा अपवाद वगळता ते सातत्याने आमदारकीचे बिरूद राखून आहेत. याकाळात त्यांनी सातत्याने राजकीय भूमिका बदलल्यात, हे विशेष !

या बदललेल्या भूमिकांनी त्यांना नवे मित्र मर्यादित भेटले, पण राजकीय शत्रूंची संख्या वर्धिष्णू होत गेली. तरीदेखील आक्रमक राजकारणाच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, बाजार समिती, जिल्हा बँक अशा बहुतेक सर्व ठिकाणी सत्ताकेंद्र स्थापन करण्यात कोकाटे यशस्वी ठरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवार यांना मानणाऱ्या गटातील महत्वाचे प्यादे म्हणूनही ते नावारूपास आलेत. त्याचाच लाभ त्यांना अलीकडील राजकारणात अजित पवारांची साथ देण्यातून झाला. छगन भुजबळ यांचे ज्येष्ठत्व डावलून कोकाटे यांना थेट कॅबिनेट मंत्रालय देण्याची दादांनी छाती केली. कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना खरेतर राज्यस्तरीय प्रतिमा तयार करण्याची संधी होती. मात्र, सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये, भुजबळ-महाजन मंत्रीद्वयीशी पंगा, भाजपविरोधी भूमिका या बाबी त्यांच्या अंगलट आल्या. विधिमंडळातील कथित ‘रमी’ प्रकरण ‘कृषी’ वरून त्यांना ‘क्रीडा’ मंत्रालयापर्यंत घेवून आले. भरीस भर तीस वर्षांपूर्वीच्या सदनिका प्रकरणाने डोके वर काढले आणि कोकाटे यांच्यावर मंत्रिपद सोडण्याचे बालंट आले. आता तर आमदारकी राहते की नाही अशी परिस्थिती त्यांच्या वाटेला आली आहे.

अनेकदा घेतलेल्या टोकाच्या राजकीय भूमिका कोकाटे यांना अडचणीत आणणाऱ्या ठरल्या. सदनिका प्रकरण हा त्याचाच परिपाक ठरला आणि वरचढ होऊ पाहणाऱ्या कोकाटे यांच्या वाटेत दिवंगत दिघोळे यांनी तीस वर्षांपूर्वी कायदेशीर त्रुटी शोधून अडथळ्याची पाचर ठोकली. आतापुरते तरी कोकाटे राजकीय संकटात आहेत. त्यांच्या भूमिका आणि निर्णय वादग्रस्त ठरल्या असल्या तरी मुंबई दरबारी एखादे काम तडीस लावण्याची धमक असणारा नेता ही कोकाटे यांची शैली त्यांच्या विरोधकांना देखील मान्य आहे. सारांशात, राजकारणात ‘अति तिथे माती’च असते. संयम, दूरदृष्टी आणि सर्वाना सोबत घेवून चालण्याची वृत्तीच व्यापक नेतृत्वाची जडणघडण करते. राजकीय लढाईत कोकाटे यांच्या वाटेला आलेले संकट इतरांच्या वाटेला येवू नये. कारण यामागे नेतृत्व खुरडले जाण्याची भीती असते. कोकाटेंचे अगदी तेच झाले.

——-

भाजपचा भरवसा स्वबळावर..

नाशिक महापालिका निवडणुकीत सत्ता राखण्याच्या हेतूने भाजप सर्वपरीने प्रयत्न करीत आहे. ते राजकीयदृष्ट्या अपेक्षित असले तरी त्यांना महायुतीत हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे नाही, हा इरादा आता स्पष्ट झाला आहे. महापालिका निवडणुका महायुतीतच लढवायच्या असा प्रदेश स्तरावरून आदेश असताना त्याला बाजूला सारून, आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना स्वबळावर लढण्याच्या बाजूने असल्याचा खलिता नाशिक भाजपच्या कारभाऱ्यांनी मुंबापुरीत धाडल्याचे ऐकिवात आहे. यामागे काही कंगोरे असल्याचे स्पष्ट आहे. एकतर भाजपचे कमळ कमालीच्या गटबाजीच्या चिखलात रुतले आहे. ते बहरवायचे असेल तर स्वबळाची मशागत करणे अपरिहार्य ठरणार आहे. तसे न झाल्यास कमळाच्या पाकळ्या विखुल्या जाण्याची दाट शक्यता आहे. मोठ्या बंडखोरीची लागण स्थानिक एकोप्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करेल. दुसरे म्हणजे पालिकेत सत्ता येईलच असे भाजपेयींचा अतिआत्मविश्वास सांगतो आहे. सत्ता आल्यानंतर भाजपला भागीदार नकोय. नाशिकमध्ये शिंदेसेनेची ताकद दखलपात्र असणार आहे. उद्या महायुती म्हटल्यावर त्यांना काही पदांची ओवाळणी टाकणे भाजपसाठी अनिवार्य ठरेल. म्हणूनच ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्यासह प्रदेश नेतृत्व महायुतीत लढण्याचे निर्देश देत असताना स्थानिकांनी मात्र कार्यकर्ता भावनांच्या नावाखाली स्वबळाचा नारा देण्यावर भर देण्यावर राहील्याचे बोलले जात आहे.

Comments are closed.