मुंबई/एनजीएन नेटवर्क
केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.