नाशिक/एनजीएन नेटवर्क
एखाद्या देशातील घडामोडींचा दुसऱ्यावर परिणाम होतो. भारतातील महागाई त्याचाच एक भाग आहे. तथापि देशातील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी दर अन्य देशांच्या तुलनेत चांगला आहे. आपल्या शेजारील देशांची स्थिती बघितल्यावर वास्तव लक्षात येईल, असा दावा भाजप राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.
केंद्रात मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. ते म्हणाले, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कांदा, द्राक्ष निर्यातीला चालना देण्यात आली. देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळत असून त्यांच्या दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे. स्वत:च्या घरात राहण्याचा विचार करू शकत नसलेला गरीब वर्ग आज तब्बल चार कोटी लघरांत वास्तव्य करीत असल्याचा दावा विजयवर्गीय यांनी केला. मोदी सरकारच्या नऊ वर्षात संपूर्ण चित्र बदलले. स्वच्छ मनाने सरकार धोरणे आखून प्रभावी अमलबजावणी करीत आहे. भ्रष्टाचार नसल्याने अर्थव्यवस्थेचा विकास झाला. आता संपूर्ण जगात भारताला सन्मान मिळत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या अमेरिकेलाही भारताकडून आस आहे. जागतिक मंदीचा देशावर फारसा परिणाम होणार नाही.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. मोफत वैद्यकीय उपचारासाठी ५० कोटी जनतेचा आरोग्य विमा काढण्यात आला. त्यातील पाच कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतल्याचे विजयवर्गीय यांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, गोवा प्रदेश प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर, माजी मंत्री जयकुमार रावल, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे. आ. राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते लक्ष्मन सावजी, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अमृता पवार, अनिल भालेराव, पावन भागुरकर, प्रशांत जाधव, गोविंद बोरसे आदि उपस्थित होते.