स्वार्थापोटी कॉंग्रेसला जवळ केल्याचा आरोप
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
ठाकरे ब्रांड महाराष्ट्रातून संपलाय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य वास्तवाधारित असून या परिस्थितीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचे मत राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी येथे व्यक्त केले. सेवा पंधरवडा शुभारंभासाठी शहरात आलेल्या महाजन यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला.
महाजन म्हणाले, भाजपसोबत असलेली नैसर्गिक युती संपवून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेसला जवळ केले. ती बाब स्वपक्षातील अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांना पटली नाही. म्हणूनच पक्षाची आज शकले झाल्याचे दिसून येते. येत्या निवडणुकीत ठाकरे यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. शिवाय, निवडणूक निकालात त्यांचा पक्ष अस्तित्वही गमावून बसलेला असेल, असा दावा महाजन यांनी केला. नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उबाठा यांनी संयुक्तपणे काढलेल्या मोर्चाची महाजन यांनी खिल्ली उडवली. दोघांना अस्तित्वासाठी काहीतरी दाखवावे लागणार आहे, अशी टिपण्णी त्यांनी केली.
बाळासाहेब यांच्या विचारांशी प्रतारणा
उद्धव यांच्या पक्षाची भाजपसोबत युती होती तोपर्यंत त्यांचे ठीकठाक होते. मात्र स्वार्थापोटी ते दूर गेले तेव्हाच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली. त्यांनी कॉंग्रेसची साथ केली. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयी मिरवणूकांत पाकिस्तानचे झेंडे मिरवले गेल्याचे उभ्या महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर विधानसभेत जनतेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, असे महाजन म्हणाले.
Comments are closed.