NGN News
Latest Marathi News

उद्धव निमसे यांच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे; अटक अपरिहार्य ?

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पंचवटीतील बहुचर्चित राहुल धोत्रे खून प्रकरणातील प्रमुख संशयित तथा माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन अर्ज बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळला. जिल्हा न्यायालयात अर्ज फेटाळल्यानंतर निमसे यांनी वरील न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, तिथेही अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अर्ज फेटाळताना न्यायालयाने पोलिसांच्या बोटचेपे धोरणावर ताशेरे ओढले.

गेल्या बैलपोळ्याच्या दिवशी किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत होवून राहुल धोत्रे नामक युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. एका गटाने राहुलवर सशस्त्र हल्ला केला, ज्यामध्ये उद्धव निमसे यांचा देखील समावेश असल्याचा आरोप धोत्रे परिवाराच्या वतीने करण्यात आला होता. निमसे हे भाजपचे माजी नगरसेवक असून महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपद देखील त्यांनी भूषवले आहे. याच अनुषंगाने निमसे यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. अशातच उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

पोलिसांच्या तपासावर ताशेरे..

दरम्यान, न्यायालयाने गुन्हा दाखल होऊनदेखील आरोपीना अद्याप अटक केली नाही, या मुद्द्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता पोलीस ठाम भूमिका घेवून निमसे यांना अटक करतात का, याकडे लाख लागून राहणार आहे. या घडामोडींमुळे निमसे यांची अटक आता अटळ मानली जात आहे.

Comments are closed.