ऐन सणासुदीत नागरिक चिंतीत; खुनाचे सत्र थांबवण्याची मागणी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अवघ्या बारा तासांत दोन युवकांच्या खुनाने शहर हादरले आहे. सातपूरच्या श्रमिकनगर भागात गुरुवारी रात्री खुनाचा पहिला प्रकार घडला, तर दुसऱ्या घटनेत आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पाथर्डीगाव परिसरात युवकाची कॅफेमध्ये चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. ऐन सणासुदीत होत असलेल्या या घटनांनी नागरिक चिंतीत झाले असून खुनाचे सत्र थांबवण्याची मागणी जोर धरत आहे.
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रमिकनगर परिसरात किरकोळ कारणावरून एका टोळक्याने जगदीश उर्फ भय्या वानखेडे ( रा. श्रमिकनगर ) या युवकाची धारदार शस्त्राने हत्या केली. जगदीश हा गरबा खेळून मित्रासोबत दुचाकीने घराकडे येत असताना वाटेत स्वामी समर्थ चौकात हल्लेखोर टोळीने त्यांची गाडी अडवून वाद घातला. ‘गाडी नीट चालवता येत नाही का ?’ अशी कुरापत काढून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला करून हत्या केली. सातपूर पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे यातील काहींवर याधीही खुनाचा गुन्हा दाखल आहे.
दुसऱ्या घटनेत पाथर्डीगाव परिसरात भरवस्तीतील एका कॅफेमध्ये दुपारच्या सुमारास युवकाला भोकसण्यात आले. रशीद हारूण खान असे त्याचे नाव आहे. त्याच्यावरही धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात येऊन हत्या केल्याचे इंदिरानगर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी सांगितले. राशीद याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या आप्तस्वकीयांनी मोठी गर्दी केल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, दोन्ही घटनांनी शहर पुरते हादरून गेले आले आहे.
Comments are closed.