नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
सशस्त्र तरुणांनी दिवसाढवळ्या भररस्त्यात दोन जणांचा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरात गुरुवारी घडली आहे. अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करत दोघांना संपवले. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवीन नाशिक परिसरातील खंडेराव मंदिर, शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यात धारदार शस्राने छातीवर गंभीर वार झाल्याने मेराज खान ( १८ ) आणि इब्राईम खान ( २३ ) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. दोघेही संजीवनगर येथील राहणारे असून एकाचा मासे विक्रीचा तर दुसऱ्याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. दोन अल्पवयीन युवक एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्याचवेळी त्यांची भाषा न समजल्याने ही शिवीगाळ आपल्याला केली या समजातून मेराज असगर अली खान आणि इब्राहिम हसन शेख या दोघांसोबत अल्पवयीन तरुणांचा वाद झाला. त्यानंतर अल्पवयीन युवकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. रागाच्या भरात टोळक्याने मेराज असगर अली खान आणि इब्राहिम हसन शेख यांच्यावर चाकू आणि दांडक्याने हल्ला केला.
या हल्ल्यात मेराज असगर अली खान याचा जागीच मृत्यू झाला. तर इब्राहिम हसन शेख हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तसेच एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील दोन विधीसंघर्षित आहे.