नाशिक/एनजीएन नेटवर्क
राज्याच्या राजकारणात संघटनात्मक स्तरावर बाळसे धरू पाहणाऱ्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये आज शहरात तुफान राडा झाला. पक्षाचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पदे वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना दोन महिला नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाडली. त्यानंतर हा वाद थेट पोलिसात गेला. मात्र पोलीस ठाण्यातही खडाजंगी पाहायला मिळाली. या प्रकाराची शहरभर चर्चा सुरु आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दाखल घेत पक्षनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये लक्ष्मी ताठे, शोभा मगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना महिला पदाधिकारी शोभा मगर आणि लक्ष्मी ताठे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मगर यांनी ताठे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर लक्ष्मी ताठे या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या असता इथेही वाद सुरू झाला. याप्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांसह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. शोभा मगर आणि त्यांचा मुलगा धीरज यांनी पोलीस स्टेशनमध्येच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच धीरज मगर यांनी विनयभंग केल्याचा आरोपही ताठे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र मगर यांनी त्याचा इन्कार करीत आपण काय बोललो, हे नेते मंडळींना माहीत असल्याचे स्पष्टीकरण दिले.
पक्षनेतृत्वाकडून तत्काळ निर्णय ..
दरम्यान, दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या राड्याबाबत सचिव भाऊसाहेब चौधरी नेमके काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना लक्ष्मी ताठे, शोभा मगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे परिपत्रक सायंकाळी काढण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आणि युवा नेते खा. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. एकीकडे पक्ष विस्तारातून पुढील निवडणूक जिंकण्याची रणनीती आखली जात असताना आजच्या राड्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा गेल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये होती. प्रत्यक्ष महिला पदाधिकारी जाहीर झाल्यानंतर अधिक मतभेद उफाळून येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राडा केलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.