इगतपुरी/एनजीएन नेटवर्क
नाशिकमध्ये चातुर्मास कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन जैन साध्वींवर काळाने घाला घातला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर हॉटेल ऑरेंजसमोर कंटेनरच्या धडकेत या साध्वी मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना आज घडली. महिला साध्वींच्या मृत्यूने जैन समाजात शोकाची भावना व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कासारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परम पूज्य श्री सिद्धाकाजी मसा व परमपूज्य श्री हर्षाईकाजी महाराज या पहाटेच्या सुमारास पायी प्रवास करत होत्या. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला धडक दिल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वी यांना धडक दिली. या दोघींचा अपघातात जागीच मृत्यू झाला. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी पायी जात असताना अपघात झाल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील जैन बांधवांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान अपघातानंतर दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले आहेत. बुधवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच, दोन्ही महिला साध्वींचे मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तसंच, अपघाताचा पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.