नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरावरील घडामोडींचे ‘साईड इफेक्टस’ आज नाशकात बघायला मिळाले. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन गटांमध्ये वादाला आज तोंड फुटल्याने मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून दोन्ही गटाकडून मोठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आज सकाळी छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात इतरांना जाण्यास मज्जाव केला. पण शरद पवार समर्थक कार्यकर्त्यांचा गट हा कार्यालयात जावून बैठक घेण्यावर ठाम होता. पण त्यांना आत जाता आले नाही. त्यामुळे शरद पवार समर्थक गटाने थेट कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडला. त्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत बैठक घेतली. पक्षाचे माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्या नेतृत्वात शरद पवार समर्थक कार्यालयाबाहेर एकवटले आहेत. शेलार म्हणाले, पक्ष कार्यालय हे आमचे आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर फाऊंडेशनने आम्हाला त्या संदर्भात पत्रदेखील दिले आहे. त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, शरद पवार यांच्या समर्थनार्थ मध्यवर्ती कार्यालयात बैठक घेण्यात यावी. पण पोलिसांनी आम्हाला अडवले आहे. ते पक्षपात करतात असा आमचा आरोप आहे. त्यांवर वरिष्ठांचा दबाव असेल. पण हे कार्यालय आम्ही ताब्यात घेणारच, असा इशाराही शेलार यांनी दिला.
दुसरीकडे अजित पवार समर्थकही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्ही शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते आहोत. पण ते ज्या पद्धतीने मोर्चा घेऊन इथे आले आहेत त्याचं काहीच कारण नव्हतं. सर्वांना उद्याची बैठक मुंबईत आहे हे माहिती आहे. या जिल्ह्याचे नेतृत्व छगन भुजबळ करतील. त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार होता, अशी बाजू त्यांनी मांडली.
————————–
@ राष्ट्रवादी कार्यालयात आज घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे छगन भुजबळ व अजितदादा पवार यांच्यासोबत आहे. परंतु आज काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी निव्वळ स्टंटबाजी करण्याच्या उद्देशाने पक्षाशी कुठलाही संबंध नसलेल्या कंपनी कामगार व इतर तरुणांना सोबत घेऊन घातलेला गोंधळ अतिशय निंदनीय आहे. अशा प्रकारे कुणीही पक्ष कार्यालयात येणार असेल तर त्यांना आम्ही कदापिही येऊ देणार नाही. कुठलीही स्टंटबाजी न करा सन्मानाने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कार्यालयात कायमच स्वागत राहील.
- अंबादास खैरे
युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष नाशिक शहर