- एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश; भाजपला धक्का
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महापलिका निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय घडामोडींना वेग आला असताना मंगळवारी दोन माजी महापौर शिवसेनेने गळाला लावले. अलीकडे भाजपच्या वळचणीला आलेल्या दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शहरात शिवसेनेची ताकद वाढली असून भाजपला हा धक्का मनाला जात आहे.
दशरथ पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांचा मुलगा प्रेम पाटील यांच्यासाठी उमेदवारीच निश्चितही केली होती. तथापि, ऐनवेळी मनसे नेते तथा दशरथ पाटील यांचे बंधू दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रेम पाटील यांचा पत्ता कट झाला. सातपूरच्या प्रभाग क्रमांक ९ (ड ) मधून दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल यांना उमेदवारी देण्यात आल्याने प्रेम पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्या अनुषंगाने अपेक्षेप्रमाणे दशरथ पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. दुसरीकडे, अशोक मुर्तडक यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपकडून उमेदवारी अपेक्षित असताना त्यांना ती नाकारण्यात आली. त्यामुळे ते प्रभाग क्रमांक ५ ड मधून शिवसेनेच्या पाठींब्यावर अपक्ष म्हणून मैदानात आहेत. यानंतर आज ते अधिकृत शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले. पाटील आणि मुर्तडक यांच्या प्रवेशावेळी मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते हे अपस्थित होते.
नितीन भोसलेही शिवसेनेत..
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एसपी ) पक्षातून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार नितीन भोसले यांनीही अल्पकाळातच पक्ष बदलाचा निर्णय घेतला. भोसले हे सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत दाखल झाले. शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एसपी ) असा प्रवास करून शिंदेंच्या शिवसेनेत स्थिरावले आहेत.
Comments are closed.