नाशिक/एनजीएन नेटवर्क
तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी लाच स्वीकारल्याचा इन्कार करीत त्यांच्या गाडीत बॅग टाकण्यात आल्याचा युक्तिवाद बहिरम यांच्या वकिलांनी केल्याने लाच प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. बहिरम यांच्या वकिलाचा युक्तिवाद म्हणजे एसीबीच्या कारवाईवर संशय मानण्यात येत आहे. दरम्यान, तहसील कार्यालय चौकशीसाठी उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांचे तपासी पथक तयार करण्यात आले आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात 15 लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाभर खबाल उडाली होती. बहिरम यांना जिल्हा व सत्र न्यायाल्याने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकिलाने या प्रकरणाबाबत उपरोक्त वक्तव्य केले. बहिरम यांनी लाच स्वीकारली नाही तर त्यांच्या गाडीत बॅग टाकण्यात आल्याचा बहिरम यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यावर बहिरम यांच्या सांगण्यानुसारच बॅग डिक्कीत ठेवल्याचे स्पष्टीकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले आहे. धुळे जिल्ह्यात बहिरम यांनी 12 हेक्टर जमीन खरेदी केली असून तर राहते घर, अनेक डेबिट कार्ड हे त्यांच्या बहिणीच्या नावावर असल्याचे एसीबी तपासात समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार रचना पवार यांच्याकडे नाशिक तहसील कार्यालयाच्या पदभाराची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
चौकशी समिती नियुक्त ..
दरम्यान, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी लाच प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तहसील कार्यालयाच्या चौकशीसाठी उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांचे तपासी पथक तयार करण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल अद्याप प्राप्त नाही; मात्र, बहिरम यांच्यावरील कारवाई आणि न्यायालयाने दिलेल्या पोलिस कोठडीनंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.