नाशिक/एनजीएन नेटवर्क
गेल्या अनेक दिवसांपासून माझ्याबद्दल समाज माध्यमातून ‘भोसले’ नाही तर ‘शालिग्राम’ असल्याची पोस्ट व्हायरल केली जात आहे. त्यामागे नेमके कोण याचा शोध घेतला असता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अधाक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी व्यासपीठावर त्यांचे समवेत भाजप प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे उपस्थित होते.
भोसले म्हणाले, मराठा समाजातल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आणि आध्यात्मिक क्षेत्राची आवड असलेल्या मला भाजपात संधी मिळाली. आम्ही जे ‘धर्मकार्य’ सुरु केले आहे त्यामुळे पवार साहेब इतके धास्तावले की त्यांनी माझे आडनांव तपासा असे बोलून त्यांचे आवडते ‘जातीयवादाचे’ शस्त्र बाहेर काढले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गौरवान्वित केलेल्या भोसले कुळात जन्माला येणे हे माझे भाग्य आहे. ‘मराठा-अध्यात्म आणि भाजप’ हे समीकरण तुमच्या पचनी पडत नाही म्हणुन तुम्ही माझे आडनांव तपासायची भाषा करताय, असा सवाल भोसले यांनी केला आहे.
तुम्ही शाळेत नांव तपासायला सांगितले म्हणुन मी माझा आणि माझ्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आणलाय, असे सांगत भोसले यांनी माध्यमांसमोर दोन दाखले सदर केले. त्यामध्ये नांदगावच्या मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर संचालित प्राथमिक व्ही. जे. हायस्कूलचा माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला आणि आर.वाय.के. कॉलेज, नाशिकचा दाखला ज्यात स्पष्टपणे त्यांचे नांव तुषार शालिग्राम भोसले असे आहे. एवढेच नाही तर वडील शालिग्राम पितांबर भोसले यांचा आमडदे येथील शाळा सोडल्याचा दाखलाही यावेळी सदर करण्यात आला.
तुषार भोसले म्हणाले, आमचे मूळगांव आमडदे, ता. भडगांव जि. जळगांव हे आहे. पारोळ्याचे तुमचे माजी आमदार सतीश पाटील यांच्या भगिनी आमच्या गावात आहेत. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कन्या आणि अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी या देखील आमच्या गावात आहेत. मी भाजपात आहे म्हणुन मी भोसले नाही, हा कोणता नियम, असा सावळी भोसले यांनी केला.
पुरावे पवारांना पाठवणार
हे सर्व कागदपत्री पुरावे आपण पवार यांना पोस्टाने पाठवत असल्याचे तुषार भोसले यांनी जाहीर केले आहे. त्याचा पवारांनी सखोल अभ्यास तसेच खात्री करावी आणि मग मी भोसले नसल्याचा किमान एक तरी पुरावा द्या नाहीतर चुकीचे बोलल्याबद्दल माफी मागावी, असे आव्हानही भोसले यांनी यावेळी दिले.