NGN News
Latest Marathi News

हरितसंपदा निर्माणासाठी…त्र्यंबकेश्वरला जय बाबाजी भक्त परिवारातर्फे वृक्षारोपण

नाशिक : अमर आढाव

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्यादरम्यान ३११ वृक्षांची लागवड करण्यात आली.

देव, देश आणि धर्मासाठी अखंड कार्य करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने विविध प्रकारच्या फळझाडे, फुलझाडे आणि छायादायक वृक्षांची लागवड त्र्यंबकेश्वर येथील आश्रम परिसरात करण्यात आली.धर्म सोहळ्यात सहभागी झालेल्या साधकांच्या हस्ते हे वृक्षारोपण संपन्न झाले. मागील महिन्यातही जय बाबाजी भक्त परिवाराने वेरुळ, पंढरपूर, काशी, ओझर, खलघाट, रत्नागिरी (नरवण) अशा प्रमुख आश्रमांसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील एकूण १०८ आश्रमांमध्ये वृक्षारोपण केले होते. याशिवाय, तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशभर एकाच दिवशी ५ लाख वृक्ष लागवडीचा विक्रमही जय बाबाजी भक्त परिवाराने केला आहे.
“पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे यावे व या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी मौनगिरीजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना घेऊन जय बाबाजी भक्त परिवार पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध असून, भविष्यात अधिकाधिक वृक्षारोपण करून हरितसंपन्न भारत घडविण्याचा संकल्प आहे.

Comments are closed.