NGN News
Latest Marathi News

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांचा सन्मान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीचे सूर, तिरंग्याचा मान व विद्यार्थ्यांचा सन्मान यामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

ध्वजारोहणाचा मान पंचवटी कॉलेजचे प्राचार्य प्रा. आशिष चौरसिया आणि फ्लाईट लेफ्टनंट पंकज जांगडा यांच्या हस्ते पार पडला. ध्वजवंदनानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या जयघोषात भारतमातेप्रती निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी, चेअरमन राजेंद्र (नाना) फड, शंकर धनवडे, बजरंग शर्मा तसेच असोसिएशनचे सर्व सल्लागार, पदाधिकारी, सदस्य आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून तरुण पिढीने देशसेवा व समाजकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण झाली. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, घोषवाक्ये आणि लघुनाटिका सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर धनवडे व बजरंग शर्मा यांनी आकर्षक पद्धतीने केले. शेवटी उपस्थितांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषात कार्यक्रमाची सांगता केली.

Comments are closed.