NGN News
Latest Marathi News

अभियंता दिन : ‘महावितरण’ प्रशिक्षणार्थी अभियंत्यांची वृद्धाश्रमाला मदत !

 नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महावितरणचे राज्यस्तरीय सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र, एकलहरे येथे प्रशिक्षण घेत असलेल्या नवनियुक्त झालेल्या विद्युत अभियंत्यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून स्वयंप्रेरणेने सामाजिक उपक्रम राबवित नाशिक येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांना गरजेच्या वस्तूंची मदत करीत प्रशिक्षणात सामाजिक बांधिलकीचे धडे गिरविले आहेत.

महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र एकलहरे येथे नवीन रुजू झालेल्या ४५ दिवसांचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या संकल्पनेतून १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करण्यात आला. अभियंता दिनाच्या दिवशी समाजपयोगी कार्य करावे, अशी संकल्पना प्रशिक्षणार्थींनी यावेळी व्यक्त केली आणि त्यानुसार शहरातील लेखानगर येथील ‘दिलासा’ वृद्धाश्रमाला सर्वांनी भेट देऊन तेथील ज्येष्ठांशी सोबत संवाद साधून त्यांना गरजेच्या वस्तू, सुकामेवा, फळे इत्यादीचे वाटप करण्यात आले.

सदर उपक्रम प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता आनंदराव देशमुख, उपकार्यकारी अभियंता चरणसिंग इंगळे व भूपेंद्र गांगुर्डे यांनी सहभाग नोंदविला. महावितरणच्या प्रशिक्षणार्थी अभियंत्यांनी पुढाकार घेऊन राबलेल्या या सामाजिक उपक्रमाचे महावितरणच्या सर्वांनी कौतुक केले.



Comments are closed.