नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशातील रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी सरकारने आज एक चांगली बातमी दिली आहे. वंदे भारतसह सर्व गाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे २५ टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाने एका आदेशात दिली आहे. ट्रेनमध्ये जास्तीत जास्त जागांचे आरक्षण व्हावे, यासाठी भाड्यात ही कपात केली जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले. याशिवाय भाडेदेखील वाहतुकीच्या स्पर्धात्मक पद्धतींवर अवलंबून राहणार आहे.
गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे, अशा गाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या विविध झोनला सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाडे कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्यासाठीच भारतीय रेल्वे तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी अधिक व्यवहार्य प्रवास बनवण्यासाठी कमी प्रवासी असलेल्या काही कमी अंतराच्या वंदे भारत यांसारख्या ट्रेनच्या भाड्यांचा आढावा घेत आहे.