मुंबई/एनजीएन नेटवर्क
मुंबई-नाशिक महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करुन हे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच शंभर ते दीडशे पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन घेण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी बाईकर्स पोलीस तैनात करण्यात येणार असून त्या माध्यमातून वाहतूक कोंडी सुरळीत केली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई-नाशिक महामार्गाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज रविवारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरुन मुंबई-नाशिक महामार्गाची पाहणी केली. भिवंडी शहरातील वडपा तसेच अपघात घडत असलेल्या खडवली या भागात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तर दुसरीकडे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत सूचना दिल्या आहेत.