NGN News
Latest Marathi News

नांदगाव : भाविकांचा ट्रॅक्टर 200 फूट खोल दरीत; दोघांचा मृत्यू, १३ जण जखमी

नांदगाव: सचिन बैरागी

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ट्रॅक्टर खोलदरीत कोसळल्याने यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व भाविक संभाजीनगर जिल्ह्यातील खामगाव तालुका कन्नड येथील होते. देवदर्शन करून घाट उतरत असताना ट्रालीसह सुमारे दोनशे फूट खोल दरीत गेल्याने ट्रालीमध्ये बसलेल्या पैकी कांताबाई नारायण गायके (वय ५६), कमलबाई जगदाळे (वय ६२) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर चेतन प्रकाश कवडे, प्रणिता प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, अप्पा सोपान राऊत, श्रावणी अप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई कवडे, प्रगती सोमनाथ नवले, आदित्य योगेश कवडे, हे भाविक देखील जखमी झाले.

जखमींवर बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून छत्रपती संभाजी नगर येथील घाटी या शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वरील घटना घडताच प्रत्यक्षदर्शी भाविक तसेच पर्यटकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ खोल दरीत उतरत सर्व जखमींना बाहेर काढून स्वतःच्या वाहनामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत पोहोचवले . घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.