NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

येवल्याचा पेपर भुजबळांसाठी ठरणार अवघड? (प्रासंगिक/ मिलिंद सजगुरे)

0

   

 ** एनजीएन नेटवर्क  

     २००४ पासून येवल्यात सलग विजयी चौकार ठोकणाऱ्या छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सवत्यासुभ्यात पक्षाध्यक्ष शरद पवारांना अव्हेरून आपले पक्षांतर्गत विरोधक अजित पवार यांच्यासोबत सलगी केली आहे. एवढ्यावरच न थांबता साहेबांचे धोरण पक्षवाढीला मारक ठरल्याचे जाहीर भाषणात सांगून भुजबळ यांनी आपल्या राजकीय गुरुविरोधात शड्डू ठोकले. याच पार्श्वभूमीवर पवारांनी पक्षफुटीनंतर भुजबळ यांना नमनाचे ‘लक्ष्य’ करीत उद्या (दि. ८) येवल्यात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये पवार काय बोलणार यासह भुजबळ यांचे तालुक्यातील कोणते समर्थक व्यासपीठावर असणार, याकडे उभ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.  

   वीस वर्षांपूर्वी सुरक्षित मतदारसंघ म्हणून भुजबळ यांनी येवल्याची निवड केली होती. येवलेकरांनी देखील भरभरून मतांचे दान करीत भुजबळ यांचा विश्वास सार्थ ठरवला. २०१४ ते २०१९ आणि आताचा वर्षभराचा काळ वगळता भुजबळ सतत पालकमंत्री पदावर राहिले. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून भुजबळ यांची राज्यस्तरावर ओळख राहिली. तथापि, आताच्या पक्षांतर्गत संघर्षात ते अनपेक्षितपणे साहेबांना सोडून ‘दादा’ गटात गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लगोलग त्यांच्या अंगावर मंत्रीपदाची झूल चढवण्यात आली. अजित पवार गटाच्या पहिल्या मेळाव्यात तडाखेबंद भाषण ठोकत भुजबळ यांनी पवारांच्या नेतृत्वाचे वाभाडे काढले. या घडामोडीत ज्यांनी भुजबळ यांना येवल्यात येण्यासाठी कधीकाळी पायघड्या घातल्या, ते त्यांचे कडवे विरोधक माणिकराव शिंदे पवारांना मुंबईत जावून भेटले आणि येवल्यातील सभेची तारीख मुक्रर झाली. पवारांच्या राज्य दौऱ्याचा श्रीगणेशा उद्या भुजबळांच्या बालेकिल्ल्यात होणार म्हटल्यावर त्याची राज्यस्तरावरही उत्सुकता लागून राहणार आहे.  

   पवार, बनकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

   येवल्याच्या राजकारणाचा लंबक आजवर मुळी माजी आमदार मारोतराव पवार, दराडे बंधू, अंबादास बनकर, माणिकराव शिंदे यांच्याभोवताली फिरत आला आहे. पैकी पवार आणि शिंदे भुजबळ यांच्यापासून दूर गेले आहेत. बाजार समिती निवडणूक राजकारणात भुजबळ-दराडे बंधूमध्ये बिनसले आहे. पवारांचे पुतणे संभाजी पवार हे शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुक उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अंबादास बनकर हे मात्र सतत भुजबळ यांच्या पाठीशी राहिले आहेत. याच अनुषंगाने मारोतराव पवार आणि अंबादास बनकर यांची भूमिका उद्याच्या सभेमध्ये स्पष्ट होणार आहे. तालुक्याच्या राजकारणातील ही जोडगोळी शरद पवारांच्या तंबूत दाखल होणे, भुजबळ यांच्यासाठी नवे आव्हान उभे करू शकते. ही बाब लक्षात घेता किमान बनकर सोबत राहावेत, यासाठी भुजबळ यांच्याकडून त्यांची मनधरणी केली जात असल्यास नवल नाही.  

    विधानसभा निवडणुकीत खरी कसोटी

  भुजबळ यांची खरी कसोटी पुढील वर्षी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत असणार आहे. आजवर तालुक्यातील किमान दोन गट सोबत ठेवण्यात यश मिळाल्याने भुजबळ यांना चार वेळा विधानसभेत निर्भेळ यश मिळवता आले. यामध्ये त्यांचे निवडणूक व्यवस्थापन देखील प्रभावी ठरले आहे. येत्या निवडणुकीत मात्र अवघी समीकरणे बदललेली असणार आहेत. तालुक्यात शिंदे गटाचा फार प्रभाव नाही. अलीकडे भाजपचे कमळ हाती घेतलेल्या आणि श्रेष्ठींनी येवला-लासलगाव क्षेत्राची जबाबदारी सोपवलेल्या आर्कि. अमृता पवार यांनी तालुक्याच्या विविध भागांत दौरे सुरु केल्यामुळे भुजबळ यांचे पाठीराखे सतर्क झाले आहेत. मात्र आता भुजबळ भाजपच्या वळचणीला आल्याने अमृता पवारांच्या मनसुब्याला धक्का बसला असल्यास नवल नाही. निवडणुकीत भाजप मनापासून भुजबळ यांच्यामागे उभा राहतो की नाही, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

     मराठा-वंजारी मतांचे ध्रुवीकरण शक्य ?

  भुजबळ यांचा आमदारकीचा प्रवास खंडित करण्यासाठी शरद पवार आगामी निवडणुकीत प्रयत्नांची शिकस्त करतील, यामध्ये शंका नाही. भुजबळ ज्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, त्याचे पवार हे कुलगुरू आहेत. भुजबळ यांच्या बलस्थानांचा तौलनिक अभ्यास करून त्यांच्या विरोधात मराठा समाजाचा एकच उमेदवार देण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, वंजारी समाज भुजबळ यांना साथ देणार नाही, याचीही पवार समर्थकांकडून पुरेपूर काळजी घेतली जाईल. यांमधून मराठा-वंजारी समाजाची भुजबळ विरोधी मोट बांधली गेली तर भुजबळ यांचा विजयपथ सुखकर राहणे आव्हानात्मक होवू  शकते. या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यास पवारांची चाणक्यनीति शिष्योत्तमाला धोबीपछाड देते की भुजबळ यांचे ‘निवडणूक व्यवस्थापन’ राजकीय गुरुवर मात करते, हे अनुभवणे रंजक ठरणार आहे.   

Leave A Reply

Your email address will not be published.