नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
वाढत्या महागाईला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल टाकण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार, नेपाळकडून टोमॅटो आणि इतर भाजीपाला आयात करण्यास तर आफ्रिकेतून डाळींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत याविषयी माहिती दिली. याविषयीचा करार पण करण्यात आला आहे.
नेपाळमधून टोमॅटोच्या आयातीवर आता कोणतेही प्रतिबंध राहणार नाही. त्यासाठी आयात सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांतच टोमॅटोची मोठी आवक नेपाळमधून होईल. भारतात अवकाळी आणि मुसळधार पावसाने पिकांचे गणित चौपट केले. त्यामुळे भाजीपाला महागला. टोमॅटोने तर दरवाढीची कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. काही शहरात टोमॅटो 300 रुपये किलोने विक्री झाला. पण नेपाळमधून आयात सुरु झाल्यापासून टोमॅटोच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येत आहे.
शुल्काशिवाय डाळींची आयात
अनेक राज्यात तूरडाळ 140 ते160 रुपये किलोवर पोहचली आहे. उडद डाळ, मसूर आणि इतर डाळी सुद्धा दरवाढीच्या मार्गावर आहेत. दरवाढीला लगाम घालण्यासाठी आफ्रिकेतून डाळीची आयात करण्यात येणार आहे. त्यासाठी आयात शुल्क हटविण्यात आले आहे. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत कोणत्याही अटी-शर्तीविना, प्रतिबंध, शुल्काशिवाय भारत डाळींची आयात करणार आहे. त्यासाठी आफ्रिकन देशांशी करार करण्यात आला आहे.