नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे. टोमॅटोचे दर गगनाला भिडल्यानं जेवणातील टोमॅटोचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहक संरक्षण मंत्रालायाच्या अखत्यारित येत असलेल्या नॅशनल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह फेडरेशनने टोमॅटोच्या दरात कपात केली आहे. आता सरकारी भावानुसार टोमॅटो ९० रुपयांऐवजी ८० रुपयांना मिळतील.
टोमॅटोचे दर आवाक्यात आणण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्ली एनसीआरसह देशाच्या विविध भागांमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकार टोमॅटोची थेट विक्री करणार आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करुन एनसीसीएफ थेट ग्राहकांना टोमॅटोची विक्री करत होती. या टोमॅटोचा दर ९० रुपये प्रति किलो इतका होता. तो आता १० रुपयांनी कमी करुन ८० रुपये करण्यात आला आहे. देशातील ५०० ठिकाणी सरकार थेट टोमॅटो विकत आहे. एनसीसीएफ) सरकारच्या सूचनेवरुन महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटोंची खरेदी केली आहे. या टोमॅटोंची विक्री दिल्लीत अनेक ठिकाणी सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून देशात टोमॅटोचे दर भडकले आहेत. या कालावधीत टोमॅटोचे दर तिपटीने वाढले आहेत.