NGN News
Latest Marathi News

उपमहापौर दालनात टिपू सुलतानचा फोटो; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

  • मालेगाव महापालिकेतील प्रकार; शहरभर तीव्र पडसाद; उपमहापौरांकडून मात्र खुलेआम समर्थन

मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहराच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकाराला हिंदुत्ववादी संघटनांसह शिन्देसेना आक्रमक झाली असून त्याचे तीव्र पडसाद शहरभर उमटत आहेत. दुसरीकडे उपमहापौरांनी मात्र या प्रकारचे खुलेआम समर्थन केले आहे.

मालेगाव महानगरपालिका महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. शुक्रवारी उपमहापौर दालनात लावलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर राजकीय वातावरण तापले. हिंदुत्ववादी संघटनांनी या कृतीवर तीव्र टीका करत उपमहापौरांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे महापालिकेत १८ नगरसेवक असलेल्या शिन्देसेनेनेही याविरुध्द शड्डू ठोकत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. टिपू सुलतानचे छायाचित्र तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी या पक्षाने महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे केली आहे. शिवाय, जोपर्यंत हा फोटो काढला जात नाही, तोपर्यंत आमचे निषेध आंदोलन सुरू राहील आणि गरज पडल्यास ते अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही सेना नगरसेवकांनी दिला आहे.

——–

@ पुढील दोन दिवसांत संबंधित छायाचित्र हटवण्यात यावे आणि या निर्णयासाठी जबाबदार असलेल्या उपमहापौरांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. जर कारवाई झाली नाही, तर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना मालेगावात येऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. 

  • अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

@ टिपू सुलतान हे इंग्रजांविरोधात लढणारे स्वातंत्र्ययोद्धे होते. भाजपच्या एका खासदारांनीही याबाबत विधान केले होते. महाराष्ट्र सरकारच्या एका राजपत्रात (गॅझेट) त्यांच्या जयंतीचा उल्लेख आहे. मग विरोध करणारे नेमके कोण आणि कशासाठी?

  • शान-ए-हिंद निहाल अहमद, उपमहापौर, मालेगाव

Comments are closed.