मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादीतून अजित पवारांनी बाहेर पडत भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. मात्र, हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या एका वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलेय. काळाच्या ओघात याची उत्तरं मिळतील असं सूचक विधान अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी केले आहे. याआधीही अजित पवार गटाने मुंबईत शरद पवारांची दोनदा भेट घेतली होती. तेव्हाही अशाच चर्चांना उधाण आले होते. आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही. यापुढंही पुरोगामी भूमिका घेऊनच पुढे जायचे आहे, असे मत पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतलाय, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केले होते. मात्र पवारांनी अधिकृतपणे कोणतीही भूमिका मांडली नसल्यानं राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.