पुणे/एनजीएन नेटवर्क
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. भुजबळ यांच्या एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितल्याने काही काळ खळबळ उडाली होती. मात्र पुणे पोलिसांनी संबंधितास तातडीने अटक केली. संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुजबळ सोमवारी पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले. त्यानंतर भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तत्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्व तपशील घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे.